X-APMC - मंचर बाजार समितीत कांद्याला उच्यांकी भाव, १० किलोला २५१ रूपये.
मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या आवकेत घट झाल्याने बाजारभावात मोठी वाढ झाली.
मंचर, दि. १८ : मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या आवकेत घट झाल्याने बाजारभावात मोठी वाढ झाली असून गुरुवारी झालेल्या लिलावात उत्कृष्ट प्रतीच्या कांद्याला १० किलोमागे २५१ रुपये असा विक्रमी भाव मिळाला. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गुरुवारी बाजार समितीत सुमारे १३ हजार ३५० पिशव्या कांद्याची आवक झाली. आवक तुलनेने कमी असतानाच देशांतर्गत व निर्यात मागणी वाढल्याने लिलावात कांद्याच्या दरांनी उसळी घेतली. विशेषतः महाराष्ट्रातील दर्जेदार कांद्याला उत्तर भारतातील बाजारपेठांमधून चांगली मागणी मिळत आहे.
राजस्थान व मध्यप्रदेश राज्यांतील कांद्याचा दर्जा तुलनेने हलका असल्याने महाराष्ट्रातील कांद्याला दिल्ली, पंजाबसह अन्य उत्तर भारतीय बाजारपेठांमध्ये मोठी मागणी वाढली आहे. तसेच आखाती देशांमधील परिस्थिती पूर्ववत होत असल्याने निर्यात मागणीतही वाढ झाली असून त्याचा सकारात्मक परिणाम बाजारभावावर दिसून येत असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती निलेश थोरात यांनी दिली.
लिलावात सुपर लॉट १ नंबर गोळा कांद्याला १० किलोमागे २३० ते २५१ रुपये, सुपर गोळा १ नंबर कांद्याला २०० ते २३० रुपये, सुपर मिडीयम २ नंबर कांद्याला १५० ते १७० रुपये, तर गोल्टी व गोल्टा कांद्याला १०० ते १५० रुपये दर मिळाला. बदला व चिंगळी कांद्याला ५० ते १०० रुपये दर मिळाल्याची माहिती उपसभापती सचिन पानसरे यांनी दिली.
No comments yet. Login to start a new discussion Start a new discussion