कृषी उत्पन्न बाजार समिती, मंचर ही शेतकऱ्यांच्या कृषी मालाच्या खरेदी-विक्री व्यवहारात पारदर्शकता, न्याय्यता आणि शिस्त निर्माण करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आली. दि. २९ ऑगस्ट १९५० रोजी बाजार समितीची स्थापना झाली असून, दि. १ ऑक्टोबर १९७१ पासून प्रत्यक्ष कामकाजास सुरुवात झाली.
महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ अंतर्गत बाजार समिती कार्यरत असून, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाला योग्य व स्पर्धात्मक बाजारभाव मिळावा, खरेदी-विक्री व्यवहार पारदर्शक पद्धतीने व्हावेत आणि व्यापारी व शेतकरी यांच्यात विश्वासार्ह बाजार व्यवस्था निर्माण व्हावी, हा समिती स्थापनेचा मूलभूत उद्देश आहे.
मंचर मुख्य बाजार सुमारे ३.०८ हेक्टर क्षेत्रात विकसित झाला आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या परिसरातच आधुनिक बाजार सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने लोणी उपबाजाराची स्थापना २५ ऑगस्ट १९७७ रोजी करण्यात आली, तर तेथे २५ मार्च २०२० पासून प्रत्यक्ष व्यवहार सुरू झाले. याशिवाय घोडेगाव, चांडोली खुर्द आणि तळेघर येथेही उपबाजारांसाठी जागा उपलब्ध असून भविष्यातील विकासाचे नियोजन करण्यात आले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती, मंचर ही राज्यातील पहिली डिजिटल बाजार समिती म्हणून ओळखली जाते. बाजार समितीने विकसित केलेल्या आधुनिक डिजिटल प्रणालीद्वारे शेतमालाचे वजन, लिलाव, बाजारभाव नोंदणी आणि शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे बाजारभावाची माहिती त्वरित उपलब्ध करून दिली जाते. यामुळे व्यवहार अधिक पारदर्शक, वेगवान आणि विश्वासार्ह झाले आहेत.
आज कृषी उत्पन्न बाजार समिती, मंचर ही केवळ कृषी मालाच्या खरेदी-विक्रीचे केंद्र नसून, शेतकरी हित, आधुनिक तंत्रज्ञान, पारदर्शक प्रशासन आणि कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्य करणारी एक प्रगत संस्था म्हणून राज्यभरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.